पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ज्याच्यावर सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्याच सुरक्षारक्षकाने तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, यातील एका १० वर्षीय चिमुरडीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या नराधमाचा डाव उधळला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८ मे) दुपारी सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी (वय २५) याने तीन मुलींना गाठले. ‘तुम्हाला टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो,’ असे आमिष दाखवून तो या चिमुरड्यांना बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन, अशी धमकीही या सुरक्षा रक्षकाने मुलींना दिली होती. आरोपीच्या या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने दाखवलेल्या या धैर्यामुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस आला.

या घटनेबाबत माहिती देताना एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी सांगितले की, पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपी दिनेश चौधरी याला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीचा त्या सोसायटीतील कामाचा तो पहिलाच दिवस होता. यापूर्वी त्याने एका सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम केले आहे.
सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी नेमलेल्या व्यक्तीकडूनच असे कृत्य घडल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.




















Join Our Whatsapp Group