भोसरी (Pclive7.com):- चिखली, कुदळवाडी परिसरातील डीपी रस्ता विकसित करण्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या वतीने आज तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत आज एकूण ४३ हजार ५५ चौरस फुट क्षेत्रातील ३६ वीट बांधकामांसह पत्राशेडवर आज शुक्रवारी (दि.२०) कारवाई करण्यात आली. बुधवारी (दि.१८) हाती घेतलेल्या कारवाईत आजपर्यंत २ लाख ३१ हजार ९९ चौरस फुल आरसीसी बांधकाम आणि पत्राशेडवर पालिकेने कारवाई केली आहे.
महापालिकेच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मधील श्रीराम चौकातून रविरंजन वजन काट्याकडे जाणारा डीपी रस्ता व विसावा चौक ते देहू आंळदी डीपी रस्ता व येथीलच ५५० मीटर लाबींचा डीपी रस्ता येथील दोन्ही बाजुला असणाऱ्या सुमारे १ हजार ६१४ चौरस फुट क्षेत्रातील ३ आरसीसी बांधकामे पाडण्यात आली. तसेच सुमारे ४३ हजार ५५ चौरस फुट क्षेत्रातील ३६ वीट बांधकामांसह पत्राशेडवर देखील पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली.
प्रभाग क्रमांक दोन चिखली, कुदळवाडी परिसरात १८ ते २० डिसेंबर दरम्यान एकूण २ लाख ३१ हजार ९९ चौरस फुट आरसीसी बांधकामे व औद्योगिक पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तीन पोकलेन, एक जेसीबी व दोन मालवाहू ट्रक यांच्या सहाय्याने अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. आज शुक्रवारी (दि.२०) कारवाई करण्यासाठी क, इ व फ क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण पथक, ५६ महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, स्थानिक पोलिस स्टेशन चिखलीमधील बंदोबस्तात १२ अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्र पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले.