थेरगाव (Pclive7.com):- गेला काही दिवसात थेरगाव परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक सोसायटीमध्ये घरपोडीचे प्रयत्न देखील झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून थेरगाव डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने परिसरातील ४८ सोसायट्यांच्या पोलिसांना निवेदन देण्यात आले. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवा, वाहनांची नाकाबंदी करावी अशी मागणी सोसायटी धारकांनी केली आहे.
पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थेरगाव येथील गंगा मेडोज सोसायटीमध्ये १८ डिसेंबर रोजी घडलेल्या घरफोडी घटनेबरोबरच थेरगावमध्ये दरोड्याच्या घटनांनी हाहाकार माजवला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गुन्ह्यात चार दरोडेखोरांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. समर्थ करीना सोसायटी आणि रॉयल कॅसल येथे तत्सम घटना आणि त्याचे प्रयत्न झाले आहेत. या घटना पुढील काळात घडू नयेत यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी.
थेरगाव डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने थेरगाव परिसरातील ४८ सोसायट्यांच्या वतीने आज दि.२१ डिसेंबर रोजी काळेवाडी पोलीस स्टेशन व वाकड पोलिस स्टेशनला भेट देऊन निवेदन दिले. यावेळी थेरगाव वासीयांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची पोलिसांना विनंती करण्यात आली. पोलिसांनी थेरगाव परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवी, तसेच नाकाबंदी करावी अशी विनंती केली आहे.
थेरगाव डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या या मागणीला पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. तसेच नागरिकांनी सुद्धा याविषयी जागरूक राहुन संशयास्पद घटनेच्या माहितीबाबत तात्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.