पिंपरी (Pclive7.com):- भोसरी मतदार संघातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तीन प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. एका प्रभाग समितीवर तीन याप्रमाणे सत्ताधारी भाजपच्या नऊ कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. निवडी बिनविरोध करुन आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदार संघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ज्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही. त्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. संधी देताना समाविष्ट गाव, जुने आणि नवीन कार्यर्त्यांचा समतोल साधला असल्याचे, आमदार लांडगे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांची आज (गुरुवारी) निवड झाली. भोसरीत मतदार संघातील ‘क’, ‘इ’, ‘फ’ तीनही प्रभागातील स्वीकृत सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. ‘क’ प्रभाग समितीवर सागर हिंगणे, वैशाली खाडे, गोपीकृष्ण धावडे या तिघांना संधी देण्यात आली आहे. ‘इ’ प्रभाग समितीवर अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे आणि ‘फ’ प्रभाग समितीवर दिनेश यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर या तिघांची प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘इ’ आणि ‘क’ प्रभागातील निवडणुकीकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली. तर, ‘फ’ प्रभाग समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्ता साने अनुउपस्थित राहिले. उर्वरित नगरसेवकांनी तिन्ही उमेदवारांना समर्थन दिले.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ”भाजपचे काम समर्थपणे करणा-या कार्यकर्त्यांना प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. प्रभाग समितीतीवर सदस्य निवडताना निष्ठावान, नवीन आणि सामाविष्ट गावाचा समतोल साधला आहे. स्वर्गिय अंकुशरराव लांडगे यांच्यासोबत काम केलेले निष्ठावान कार्यकर्ते गोपीकृष्ण धावडे, वैशाली खाडे यांना संधी देण्यात आली आहे. तर, समाविष्ट गावातील अजित बुर्डे, साधना तापकीर यांना देखील स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रभाग समितीवर काम करण्याची संधी मिळालेल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवावेत. नागरिकांच्या अडचणी, समस्यांना प्रभाग समितीच्या बैठकीत वाचा फोडावी. त्यांना न्याय मिळवून द्यावा”.























Join Our Whatsapp Group