पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना गंडा घालत होती. या टोळीसाठी सक्रिय असणारा भारतातील मुख्य सुत्रधार सॅम उर्फ डेव्हिड उर्फ संबीधकुमार नायकच्या हिंजवडी येथे मुसक्या आळवण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाला यश आले आहे. मुख्य आरोपीसह झारखंड, गुजरात, उडीसा येथील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी सॅम ऊर्फ डेविड ऊर्फ संबीधकुमार श्रीपती नायक (वय २२ वर्षे रा. डी ११२, सेक्टर नं. १४, राऊलकिला, उडीसा), राजअंश सिंग संतोष सिंग (वय-२१ वर्षे, बेहरी हनुमान चौक, हनुमान मंदीरासमोर, हजारीबाग, झारखंड), प्रोफेसर उर्फ हिमांशुकुमार गणेश ठाकुर (वय २४ वर्षे रा. विलेज कुद, पोस्ट रेवाली, हजारीबाग, झारखंड), गौरव अनिलकुमार शर्मा (वय ४० वर्षे. राजन नगर, सोना कॉम्प्लेक्स, फ्लॅट नंबर १०२, बी विंग, वलसाड, गुजरात), अंकुश रामराव मोरे (वय ३१ वर्षे, रा. डी/२, ४०२, सेरीन मेडोज, गंगापुर खेड, नाशिक) यांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उडीसा येथील सॅम चार वर्षांपूर्वी मुंबईत बॉलिवूडमध्ये चमकण्यासाठी आला होता. मात्र कालांतराने पैशांची चणचण भासू लागल्याने सॅमने सायबर गुन्ह्याची वाट धरली. पुढे तो कंबोडिया देशातील टोळीशी जोडला गेला. ही टोळी गुंतवणुकीच्या दृष्टीने बनावट अँप आणि वेबसाईटची निर्मिती करते आणि अनेक भारतीयांना गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवते. या आमिषाला बळी पडणाऱ्या व्यक्तींना पैसे गुंतवण्यासाठी जी बँक खाती दिली जायची, ती खाती बनवण्यासाठी सॅम कार्यरत होता. ज्यांना पैशांची गरज आहे, अशांच्या नावाने सॅम बँकेत खाती तयार करायचा. मग त्या खात्यात गुंतवणूकदार पैसे टाकायचे अन ते पैसे कंबोडियातील टोळी दुसऱ्या खात्यात वळवत असे. मग सॅम ज्याच्या नावाने बँकेत खातं आहे, त्याला पैसे द्यायचा. मात्र पिंपरी चिंचवडमधील फसवणूक झालेल्या एका गुंतवणूकदाराने सायबर विभागाची मदत घेतली आणि कंबोडिया देशासाठी काम करणाऱ्या भारतीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, श्रीकांत कबुले, विशाल निचीत, स्वप्निल खणसे, सुभाष पाटील, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, प्रिया बसावे, प्रितम भालेराव, सरीता तुपे, धरती वाडेकर, ईश्वरी आंबरे, मोनिका चित्तेवार, महेश मोटकर, सुरज शिंदे, टेकाळे, सुरंजन चव्हाण, दिपाली टोपे, दिपाली चव्हाण सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
नागरीकांना आवाहन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशनचा वापर करावा. शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशन हे वेगवेगळया खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर गुंतवणुक करत नाहीत ना याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बैंक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.
– संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड.
























Join Our Whatsapp Group