पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम नगर परिसरात ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्री करताना आढळून आल्याने गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका दुकानावर छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत ८५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अहमद यासिन हमीद शेख (वय ३५ वर्षे, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई मितेश यादव यांनी फिर्याद दिली आहे.

संत तुकाराम नगर येथील डॉ. डी. वाय पाटील कॉलेज जवळ (दि.१६) रोजी सायंकाळी ‘लाईव्ह इमारेटस’ नावाच्या दुकानात ही कारवाई करण्यात आली. भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या विविध फ्लेवरच्या ई-सिगारेट, सिगारेट व तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर पदार्थांचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ८५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जिनेडी हे पुढील तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group