पिंपरी (Pclive7.com):- चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करत आता वाहतूक प्रशासन ‘ॲक्शन’ मोड मध्ये आले आहे. या अंतर्गत कालपासून तब्बल ५० हून अधिक अवजड वाहनांना टो करून इतरत्र स्थलांतरीत करण्याबरोबरच त्यांच्याकडून चलन वसूली करण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली.

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते, याच पार्श्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आली आहे.

चाकण तळेगाव औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने उद्योग आणि कंपन्या असल्याने दररोज हजारो कामगारांची वाहतूक तसेच अवजड वाहनांची ये-जा या ठिकाणी सुरू असते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे, ही समस्या सोडविण्यासाठी आता ही कारवाई सुरु करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने या संदर्भात स्थानिक पातळीवर आवाहन देखील करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.





















Join Our Whatsapp Group