पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, नगरसेवक शितल शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, तर मनोज ब्राह्मणकर यांची महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील भाजप ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी योगेश सागर आणि प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, शितल शिंदे आणि मनोज ब्राह्मणकर यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

नगरसेवक शितल शिंदे यांनी पक्ष संघटन, सामाजिक कार्य आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ प्रदेश पातळीवरील संघटन वाढीसाठी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच मनोज ब्राह्मणकर यांनी पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, कोषाध्यक्ष म्हणून आर्थिक नियोजन आणि संघटनात्मक बळकटीसाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या नियुक्तीबद्दल भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांकडून शितल शिंदे व मनोज ब्राह्मणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.




















Join Our Whatsapp Group