
एबीव्हीपीने धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप
एबीव्हीपीचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी या ठिकाणच्या तरुणांना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत धमकावत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. या गोंधळानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमल्याने परिस्थिती अधिकच चिघळल्याचं दिसून आलं.
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांच्या 30 अटी
पुण्यातील आरटीओ कार्यालयाशेजारील एसएसपीएमएस मैदानावर 22 ऑगस्ट रोजी राहुल गांधींचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊपर्यंत कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली. या कार्यक्रमाला 8 ते 10 हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी प्रवेश व्यवस्था आणि पुरुष-महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना पोलिसांनी आयोजकांना दिल्या आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी किमान चार प्रवेशद्वार आणि स्वयंसेवकांची नियुक्ती बंधनकारक करण्यात आली आहे.
सर्व संबंधित विभागांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे पोलिसांनी निर्देश दिले. तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात आक्षेपार्ह तसेच धार्मिक भावना दुखावणारा मजकूर किंवा घोषणाबाजी टाळण्याचे निर्देश पोलिसांनी दिले.
विविध जिल्ह्यांतून महिला आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी विद्यार्थिनी आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.






















Join Our Whatsapp Group