पिंपरी (Pclive7.com):- खराबवाडी येथे कंपनी कर्मचाऱ्याच्या मानेला पिस्तूल -लावून एक लाख आठ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. तब्बल १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संगमनेर येथील पाच सराईत आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून कार, दुचाकी, छऱ्यांचे पिस्तूल, मोबाइल आणि रोकड असा एकूण ११ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सार्थक पोपट दाते (वय २१), अजित बन्सी पारधी (वय २२), सत्यवान सुनील देवकर (वय १९), हनुमंत भास्कर दाते (वय २७) आणि यश सोमनाथ पवार (वय २०, सर्व रा. जांबुत खुर्द, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. १० ऑगस्ट रोजी रात्री गुडविल ट्रान्सपोर्ट कंपनीचे कर्मचारी धीरज यादव आणि पिकअप चालक रामभवन सिंह हे खराबवाडी येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून एक लाख रुपये काढून पिकअपमधून जात होते. पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारने त्यांचा रस्ता अडविला. लाल रंगाच्या स्कूटीवरून आलेल्या आरोपींनीही मानेला छऱ्यांचे पिस्तूल लावून एक लाख आठ हजार रुपयांची रोकड लुटली. याप्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने १२० कॅमऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींना गजाआड केले. त्यांच्याकडून कार, मोटारसायकल, छऱ्यांचे पिस्तूल, मोबाइल आणि २४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस अंमलदार राजाराम लोणकर, महेश वायबसे, अमोल बोराटे, गणेश महाडीक, संतोष असवले, सचिन मोरे, गणेश सोनटक्के, अंजनराव सोडगीर, रामदास मेरगळ, शेखर खराडे, अमोल वेताळ, अमोल माटे, बाबाराजे मुंढे, दयानंद खेडकर, संदिप सुखदाणे, सचिन नागरे, प्रशांत सोनवणे, तांत्रिक विश्लेषक, पोलीस शिपाई त्रिनयन बाळसराफ, नागेश माळी, ननावरे यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group