पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भटक्या कुत्र्यांचा तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाळीव श्वानांसह पालिका आवारात आंदोलन छेडले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला. भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना कराव्यात तसेच या प्रश्नावर प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

न्यायालयीन निर्देशांचा आधार घेत प्रशासनाने हात झटकू नये, तर आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा वाढवून कारवाईचा वेग वाढवावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. “आणखी किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, आज केवळ पाळीव श्वानांसह आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाने ठोस आणि प्रभावी पावले उचलली नाहीत तर पुढील आंदोलनात शहरातील भटकी कुत्री थेट महापालिका आवारात आणली जातील.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, नगरसेवक शेखर चिंचवडे, पंकज भालेकर, यश साने, तुषार सहाणे, विकास साने, अनंत कोऱ्हाळे, विक्रांत लांडे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, फजल शेख, नगरसेविका संगीता ताम्हणे, वैशाली घोडेकर, भीमाताई फुगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, चिखली येथे एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.





















Join Our Whatsapp Group