पिंपरी (Pclive7.com):- दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गीताचा कथित अवमान झाल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ उडाला. या मुद्द्यावरून भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली आणि सभा तहकूब करण्याची मागणी केली.

सभेच्या सुरुवातीलाच भाजप नगरसेवकांनी ‘वंदे मातरम्’ गीताच्या कथित अवमानाचा निषेध नोंदवत या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ‘ज्यांना वंदे मातरम् गीत पूर्णपणे येते त्यांनीच ते म्हणावे’ या वक्तव्यावरूनही सभागृहात वाद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या मुद्द्यावरून वातावरण अधिकच तापले असून सभागृहात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत संबंधित घटनेचा निषेध व्यक्त केला आणि सभा तहकूब करण्याची मागणी लावून धरली.
सभागृहातील वाढता गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता महापौर रवी लांडे यांनी हस्तक्षेप करत सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली. त्यानंतर सभा कामकाज स्थगित करण्यात आले.




















Join Our Whatsapp Group