पिंपरी (Pclive7.com) :- पिंपरीतील पवना नदी घाट परिसरातील बाबा छत्तुराम झुलेलाल मंदिर येथे गुरुवार, दि.२० ऑगस्ट रोजी ‘श्री झुलेलाल जो चालियो साहेब’ हा धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सिंधी समाजातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला, अशी माहिती जगदीश लालचंदानी यांनी दिली.

या कार्यक्रमाला साई वसनशाह दरबार, उल्हासनगर-५ येथील बाबा साई कालीराम साहेब (सर्वात मोठे गुरु) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषात बाबा साई कालीराम साहेब यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी मंदिराचे सर्व ट्रस्टी, सिंधी समाजातील बांधव, व्यापारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाराजांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांनी महाराजांच्या सान्निध्यात सत्संग, भजन आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान झुलेलाल यांच्याप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करण्यात आली. तसेच समाजामध्ये एकात्मता, बंधुभाव आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश देण्यात आला, असेही जगदीश लालचंदानी यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group