पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर तसेच, भारतमाता चौक, नढेनगर, कोकणेनगर, पाचपीर चौक, आदर्शनगर, ज्योतिबानगर परिसरातील रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी विरोधी पक्ष नेते मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.

रस्त्यांवरील मोठ्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनचालकांना खड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. अनेक नागरिक जखमी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही खड्ड्यांमधून वाट काढत शाळेत जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दुचाकीस्वारांना या रस्त्यांवरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने विलंब न करता खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी तक्रार माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group