पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील विविध वॉर्डांमध्ये सार्वजनिक जागांवर होणाऱ्या बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते, फूटपाथ, मैदाने, पार्किंगची ठिकाणे आणि सार्वजनिक सुविधा केंद्रांवर व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी किंवा इतर घटकांनी बेकायदेशीर ताबा घेतल्याने शहरातील वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज रावसाहेब बगाडे यांनी संबंधित वॉर्ड अधिकारी यांना लेखी तक्रार सादर करून तत्काळ अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याची मागणी केली आहे.

मुख्य मागण्या:
•वॉर्डातील सर्व सार्वजनिक जागांचे सर्वेक्षण करून अतिक्रमणाची नोंद घ्यावी
•फूटपाथ, रस्ते व सार्वजनिक जागांवरील बेकायदेशीर व्यवसाय तात्काळ हटवावेत
•नागरिकांच्या तक्रारींसाठी विशेष मोहीम आणि संपर्क केंद्र सुरू करावे
•कारवाईबाबत मासिक अहवाल जनतेसमोर सादर करावा
बगाडे यांनी आपल्या तक्रारीमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, “लोकांच्या कराच्या पैशातून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक जागा काही मोजक्या लोकांच्या बेकायदेशीर ताब्यात जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने पक्षभेद न बघता ठोस कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल.”