पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जेदार व उच्च शैक्षणिक मूल्य जपत नावलौकिक प्राप्त केला आहे. पीसीईटी संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) च्या टीम मेव्हरिक इंडिया संघाने अमेरिकेत व्हॅन नुयस, कॅलिफोर्निया येथे एप्रिल महिन्यात जागतिक स्तरावरील एअरोडिझाईन स्पर्धेत आशिया खंडात द्वितीय क्रमांक तर जागतिक स्तरावर सहावा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जगभरातील सत्तरहून अधिक विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते.
पीसीसीओई टीम मेव्हरिक इंडियाने डिझाईन रिपोर्ट विभागात सर्वाधिक गुण मिळवत जगात दुसरे स्थान पटकावले. तसेच मिशन परफॉर्मन्स मध्ये सहावा क्रमांक मिळवून भारतीयांच्या शैक्षणिक, अभियांत्रिकी कौशल्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे.

पाच वर्षांपूर्वी मेव्हरिक इंडिया ची सुरुवात उपलब्ध संसाधनातून झाली. प्रारंभी काही प्रयोग असफल झाले. मात्र त्यांनी हार न मानता प्रयत्नपूर्वक आणि अपयशातून अनुभवातून शिकत नवीन आधुनिकता शिकत स्वतःला सक्षम केले. भरपूर मेहनत, चिकाटी, तांत्रिक कल्पकतेच्या बळावर या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे, अशी भावना पीसीईटी विश्वस्त मंडळाने व्यक्त केली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी टीम मेव्हरिक इंडियाचे विद्यार्थी, मार्गदर्शक प्रा. चंदन इंगोले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.