पिंपळे निलख (Pclive7.com):- नदी सुधार प्रकल्प ज्या उद्देशाने हाती घेण्यात आलेला आहे, तो उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होताना दिसत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील नदीकाठची लाखो झाडे या ठिकाणी तोडली जाणार आहेत. नदी पात्र भराव टाकून कमी केले जाणार आहे. पर्यावरण प्रेमींनी याला तीव्र विरोध दर्शवला असून राज्य सरकार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून यातून काहीतरी मार्ग काढू, मात्र तूर्तास ह्या नदी सुधार प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी असे आदेश राज्य सरकारच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना देत असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज (दि.२७) सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज शेकडो पर्यावरण प्रेमी पिंपळे निलख येथे रस्त्यावर उतरले होते. १०० हून अधिक संघटनांनी शहीद अशोक कामठे उद्यान ते पिंपळे निलख स्मशान भूमी असा लाँग मार्च काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना सुद्धा हा प्रकल्प राबविला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप बघायला मिळत आहे.
दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन या नदी सुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. पर्यावरण प्रेमींचा या प्रकल्पाला होणारा वाढता विरोध पाहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना या कामाला तात्पुरती स्थगिती देत असल्याच्या सूचना करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

अण्णा बनसोडे यांनी यावेळी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिकेच्या हद्दीत हा नदी सुधार प्रकल्प चालू आहे. वास्तविक बघितलं तर ज्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे, तो उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होताना दिसत नाही. पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील नदीपात्रातील लाखो झाडं या ठिकाणी तोडली जाणार आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नदी सुधार प्रकल्पात नदीची रुंदी ही वाढली पाहिजे, परंतु या नदीत भराव टाकून पात्र कमी केले जात आहे. या ठिकाणी १०० ते १५० फूट नदीपात्रात भर टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच झालेल्या आंदोलनात पर्यावरण प्रेमी नदीपात्रात उतरले होते, त्यावेळी अवघड गुडघ्यावर पाणी दिसून आले. हा प्रकल्प अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास कालांतराने नदी बुजल्याचे चित्र असेल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका आयुक्तांना सूचना देणार आहे, हे काम तात्काळ बंद करण्यात यावे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र आज तूर्तास हे काम बंद करण्यात यावे अशा सूचना मी करणार असल्याचे अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.























Join Our Whatsapp Group