पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्यात सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या MPSC परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्यात याव्यात अशी मागणी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केला.

यासंदर्भात आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. दरम्यान MPSC ने ३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षांचे वेळापत्रक कायम ठेवले आहे. अशा आपत्तीजनक स्थितीत, दूरवरून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार असून काही ठिकाणी रस्ते बंद आहेत. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच काही भागात सततच्या पावसामुळे परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. अशा वेळी परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
त्यामुळे MPSC ने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा आणि येणाऱ्या काही दिवसात होणारे पेपर स्थगित करावेत, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.