पिंपरी (Pclive7.com):- ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे मराठी रंगभूमीवरील आशयसंपन्न नाटक आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाचे आहेत, हा ठाम संदेश हे नाटक देते. दमदार संवाद, जोशपूर्ण अभिनय, लोककलेच्या ढंगात हलक्याफुलक्या विनोदातून गंभीर आशय मांडला जातो. समाजातील विभागणीला आरसा दाखवून समानता, न्याय व बंधुता यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे नाटक आजही तितकेच सुसंगत आहे आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करून जातं. लोककला व आधुनिक रंगभूमीच्या संगमातून समानता व न्यायाचा संदेश देतं. ७०० हून अधिक प्रयोगांनंतरही हे नाटक आजही तितकंच विचारप्रवर्तक आणि समकालीन आहे.

(ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर यांच्या लेखणीतून..)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची महती सांगणारे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे आशयसंपन्न आणि विचारप्रवर्तक मराठी नाटक नव्या दमाने पुन्हा एकदा रंगमंचावर दाखल झाले आहे. प्रसिध्द लेखक राजकुमार तांगडे यांनी लिहीलेले आणि लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा कैलास वाघमारे आणि संभाजी तांगडे यांनी समर्थपणे सांभाळली आहे. अद्वैत थिएटर्सचे युवा निर्माते राहुल भंडारे यांची निर्मिती आहे. अंर्तमुख होऊन विचार करायला भाग पाडणारे हे नाटक जातीय असमानता, सामाजिक न्याय, सांस्कृतिक राजकारण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खरी भूमिका यावर आधारित आहे. एकप्रकारे समाजातील जातियतेची भिंत पाडण्याची चळवळ आहे.

नाटकाची शैली पारंपरिक लोककला आणि आधुनिक रंगभूमीचे मिश्रण आहे. लोकनाट्य आणि राजकीय नाट्य यांचा उत्तम संगम, बहुजन समाजाचा इतिहास आणि आधुनिक काळातील ओळख, राजकारण यांचा ऊहापोह हे नाटक करते. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ फक्त मनोरंजन करत नाही तर ते सामाजिक जागृती, इतिहासाचा पुनर्विचार आणि समानतेचा संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. शिवाजी महाराज हे कुठल्या एका जाती-धर्माचे, समाजाचे किवा प्रांताचे नाहीत. ते कष्टकर्त्यांचे, शेतकऱ्यांचे, पिडीतांचे, शोषितांचे प्रेरणास्थान आहेत. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. मात्र महाराजांचे नाव घेऊन समाजात फूट पाडण्याचे कारस्थान केले जाते. वास्तवात महाराजांनी कधीही कुणाच्याही जातीपातीवरून भेदभाव केला नव्हता. मात्र तरीही महाराजांचे नाव घेऊन लोकांची विभागणी केली जाते. महारांजाच्या मूळ विचारांना सोयीस्करपणे बगल दिली जाते. महाराजांचे नाव वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून तसेच जातीय गटांकडून स्वतःच्या सोयीसाठी कसे वापरले जाते, यावर नाटकातून परखड भाष्य केले जाते.

पूर्ण सामाजिक भान ठेवून, अभ्यासपूर्ण पध्दतीने नाटकाची मांडणी करण्यात आली आहे. बोलीभाषेतील खुसखुशीत संवादांच्या माध्यमातून हसत-खेळत नेमके मर्मावर बोट ठेवले जाते. आजच्या राजकारणाला लागू पडेल, असा संदर्भही नाटकात आहे. सर्व बाजू मांडून अखेरीस त्यातून काय घ्यायचे, याचा निर्णय प्रेक्षकांवर सोडला जातो.

‘शिवाजी अंडरग्राऊंड’ या नावामागे अर्थ असा की, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकपरंपरेत आहे, पण मुख्य प्रवाहातील लिखित इतिहासात तो दाबला गेला आहे. नाटकाचे कथानक ‘भीमनगर’ नावाच्या एका बहुजन वस्तीत घडते. तिथे तरुणांचा गट “शिवाजी महाराज खरं कोणाचे?” यावर चर्चा करतो. शिवाजी महाराज हे कोणत्याही जाती-धर्मापुरते मर्यादित नाही. जातपात आणि राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवणारे हे नाटक आहे. समाजातील तळागाळातील लोकांना महाराजांचा इतिहास आणि स्वाभिमान दाखवणारे हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक आंदोलन आहे. शिवाजी महाराजांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. नाटकात शिवाजी महाराजांचा जनतेसाठी, शोषितांसाठी असलेला संघर्ष अधोरेखित केला जातो.

आजच्या काळातील नाटक..
मुंबईतील यशवंत नाट्य संकुलात (माटुंगा) २० मे २०१२ रोजी पहिला प्रयोग झाला. तेव्हापासून सुरू झालेला या नाटकाचा प्रवास ७०० प्रयोगांचा टप्पा पार केल्यानंतरही सुरूच आहे. मूळचे शेतकरी असलेल्या जालना परिसरातील कलाकारांनी मिळून हे नाटक बसवलेले आहे. विविध अडचणींवर मात करून त्यांनी आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. अगदी १० तासांचा प्रवास करून नाटकांच्या प्रयोगासाठी कलाकार येतात. सामुहिक कलाकृती असलेले हे नाटक आता समाजाचे झाले आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही प्रचंड लोकप्रिय झालेल्या या नाटकाला अनेक पुरस्कार व समाजमान्यता मिळाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाटकाचे भरभरून कौतुक केले. काही ठिकाणी राजकीय विरोध आणि वाद निर्माण झाले. काहींना हे नाटक त्यांच्या राजकीय विचारसरणीविरुद्ध वाटले.
मध्यंतरी थांबलेले हे नाटक आता निर्माते राहूल भंडारे यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा रंगभूमीवर आले आहे. इतक्या वर्षानंतरही हे नाटक आजच्या काळातील वाटते. कारण ते वर्तमानाला भिडते. केवळ इतिहास सांगत नाही. तर, ते प्रेक्षकांना आरसा दाखवण्याचे काम करते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे असून त्यांचा वारसा विभागणीचा नाही तर एकतेचा आहे, हा महत्त्वपूर्ण संदेशही देते. हे नाटक फक्त रंगमंचावर घडत नाही. तर ते प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात नवा प्रकाश पेरतं, हे नक्की.!
– बाळासाहेब जवळकर (ज्येष्ठ पत्रकार)