शहरातील ३२ प्रभागांसाठी प्राप्त हरकतींवर झाली सुनावणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांची सुनावणी आज चिंचवड येथील ॲटो क्लस्टर सभागृहात पार पडली. सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव तथा प्राधिकृत अधिकारी प्रविण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सुनावणी प्रक्रिया पार पडली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सुनावणी प्रक्रियेचे कामकाज पार पाडले. यावेळी सहशहर अभियंता मनोज सेठीया, बापु गायकवाड, अनिल भालसाकळे, सहाय्यक नगररचना संचालक प्रशांत शिंपी, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेने २२ ऑगस्ट २०२५ रोजी ३२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती. प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच महापालिका भवनामध्येही हे नकाशे माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आले होते. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना देण्यासाठी गुरुवार ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर आज प्रभागनिहाय टप्प्याटप्याने सुनावणी घेण्यात आली.

या सुनावणीदरम्यान हरकतदारांनी त्यांच्या हरकतीच्या अनुषंगाने अतिरिक्त स्वरूपात म्हणणे सादर केले .हरकतदाराची हरकत, त्यांनी सुनावणी दरम्यान सादर केलेले म्हणणे, शासनाचे निर्देश आणि त्या अनुषंगाने समोर येणारी वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक हरकत निर्णित करण्यात येणार आहे. तदनंतर अंतिम प्रभाग रचना शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल .

प्रभागनिहाय सुनावणीचे जाहीर करण्यात आले होते वेळापत्रक..
प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकतींच्या सुनावणीसाठी हरकतदारांना पूर्वसूचना देऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रभागनिहाय व हरकतीच्या क्रमांकानुसार हरकतदारांना वेळ कळवण्यात आली होती. या सुनावणीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार दुपारी १ वाजता प्रभाग क्रमांक १, २, ११ आणि १२ वर आलेल्या हरकतींची, दुपारी २ वाजता प्रभाग क्रमांक ३, ४, ६, ७, ८, ९, १०, १४ आणि २० वर आलेल्या हरकतींची, दुपारी ३ वाजता प्रभाग क्रमांक १० आणि ११ वर आलेल्या हरकतींची आणि सायंकाळी ४ वाजता प्रभाग क्रमांक २३, २४, २५, २६, २९, ३१ आणि ३२ वर आलेल्या हरकतींची सुनावणी सुरू करण्यात आली.