पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्याची संधी आणि ११२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ५९ वर्षीय व्यक्तीची दोन कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोशी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडली.

याप्रकरणी एका ५९ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अजय राजाराम खडके (कोल्हापूर) आणि ॲड. सोमनाथ कदम (निगडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना सामाजिक कार्याची संधी देऊ असे सांगितले. एका आरोपीच्या ११२ कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिटवर मिळणारे व्याज वापरण्यास मिळेल असे सांगितले. यासाठी लागणाऱ्या ३ कोटी रुपयांपैकी दोन कोटी ६५ लाख रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. आरोपींनी फिर्यादीसोबत बनावट करारनामा, बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बनावट डिमांड ड्राफ्टचा वापर करून फसवणूक केली. त्यांनी फिर्यादीचे दोन ६५ लाख रुपये परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
