पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे येथील एका पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यावरून झालेल्या वादातून तीन तरुणांनी पेट्रोल पंपावरील दोघांना चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.८) रात्री चिंतामणी पेट्रोल पंपाजवळ, अशोक नगर, ताथवडे येथे घडली.
याप्रकरणी स्वप्निल बाळासाहेब नवले (वय ३८, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ ज्ञानेश्वर खंडाळकर (वय २५, वाकड) आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ खंडाळकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा चुलत भाऊ श्रीधर नवले हा पेट्रोल पंपावर गप्पा मारत असताना, पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या तीन तरुणांना पेट्रोल पंपाजवळ सिगारेट पिण्यास नकार दिल्याने वाद झाला. याचा राग आल्याने पल्सर चालकाने पेट्रोल भरणाऱ्या कामगाराला जोरदार धडक दिली. फिर्यादी आणि त्यांचे सहकारी मदतीसाठी गेले असता, आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने वार केले. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी वाकड पोलिसांनी सौरभ खंडाळकर याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक मोरे हे पुढील तपास करीत आहेत.