
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड क्रेझ असणारे जे काही मोजकेच नेते आहेत, त्यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अगदी वरच्या श्रेणीत मोडतात. अजित पवारांच्या नावाला असलेल्या ‘टीआरपी’मुळे म्हणा किंवा त्यांच्या विविध कृती, भूमिका आणि विधानांमुळे ते सातत्याने चर्चेत असतात. तेच ‘लोकप्रिय’ अजितदादा पिंपरी-चिंचवडकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘जनसंवाद’ घेणार आहेत, याची माहिती होताच शहरवासियांकडून तक्रारी मांडणाऱ्या निवेदनांचा अक्षरश: पाऊस पडला. कार्यक्रमाच्या ठिकाणी तुडुंब गर्दी उसळली. अजितदादांच्या पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
(लेखन – जेष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर)

पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच २० आणि २१ सप्टेंबरला अजितदादांचा पिंपरी-चिंचवड दौरा झाला. राष्ट्रवादीचा फौजफाटा घेऊन अजितदादा पिंपरी-चिंचवड शहरातील गल्लीबोळात फिरले. ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. कुठे टपरीवर चहा घेतला तर कुठे वडेपावाचा आस्वाद घेतला आणि मिसळीवर ताव मारला. कार्यकर्त्यांच्या घरी जमीनीवर बसून भोजनही केले.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिळून मिसळून राहणारा नेता अशी त्यांची राज्यव्यापी प्रतिमा तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड दौऱ्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. स्थानिक नेत्यांना थोडेसे बाजूला ठेवून खासगी कंपनीच्या सल्ल्याने व नियोजनानुसार संपूर्ण दौऱ्याची आखणी करण्यात आली होती.

तक्रारींचा पाऊस..
काळेवाडीतील ‘रागा पॅलेस’ या प्रशस्त वास्तूत झालेल्या ‘जनसंवाद’ या उपक्रमाअंतर्गत चार हजारांहून अधिक तक्रारी अजितदादांपुढे मांडल्या गेल्या. त्यात वैयक्तिक गाऱ्हाणी होती. सार्वजनिक समस्या होत्या. गुन्हेगारीविषयक चिंता व्यक्त करणारी निवेदने होती. सर्वात जास्त व गंभीर तक्रारी पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय कारभाराबद्दल होत्या.

मार्च २०२२ पासून पिंपरी पालिकेत प्रशासकीय राजवट असून आयुक्त शेखरसिंह हेच प्रशासक आहेत. लोकप्रतिनिधी नसताना सगळा कारभार शेखरसिंहांच्या माध्यमातून सुरू आहे. ‘भीक नको पण कुत्रं आवर’, ‘एक ना धड भाराभर चिंध्या’, ‘आंधळ दळतयं अन् कुत्रं पीठ खातयं’ अशा सगळ्या म्हणी शेखरसिंह यांच्या कार्यपध्दतीला लागू पडतात. गेल्या तीन वर्षातील पालिकेच्या अत्यंतिक भ्रष्ट आणि अनागोंदी कारभारावरून शहरवासियांमध्ये प्रचंड संताप आहे. तो वेळोवेळी व्यक्त झाला आहेच. जनसंवादातील असंख्य तक्रारींमध्येही तो नव्याने दिसून आला.

शेखरसिंह आजी-माजी पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना वेळ देत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असणारे ठराविक नेते आणि धनदांडगे वगळता इतर कोणालाही किंमत देत नाहीत. शहरातील नागरिकांना ते उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या तक्रारी तथा गाऱ्हाणी ऐकूनही घेत नाहीत. कोणाचे मोबाईल उचलत नाहीत. कोणी मोबाईलवर संदेश पाठवल्यास प्रतिसाद देत नाहीत. सर्वसामान्यांशी संबंधित कामांकडे दुर्लक्ष करून धंदेवाईक कामांना प्राधान्य देतात. पालिकेतील कार्यालयात ते बसत नाहीत. बहुतांश ते बाहेरच असतात. सगळा ‘आठवडा बाजार’ ऑटो क्लस्टरमधून चालवतात, अशा त्यांच्याविषयी तक्रारी आहेत. महापालिकेची लूट करणारी ‘कोटींच्या कोटी उड्डाणे’ दररोज सुरू आहेत. वारेमाप उधळपट्टीवर कोणाचेही नियंत्रण नाही. मंत्रालयात पैसे देऊन प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांनी ‘वसुली’साठी धुमाकूळ चालवला आहे. अशा दरोडेखोर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नाही. याउलट नेतेच त्यांना पाठिशी घालतात. स्वत:ची धंद्याची कामे करवून घेतात, अशी परिस्थिती आहे.

पिंपरी पालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासात सर्वात जास्त भ्रष्टाचार गेल्या साडेतीन वर्षात झाल्याचे स्पष्टपणे दिसते. किरकोळ कामांसाठी करोडो रूपये मोजण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार, कंत्राटदार, ठराविक नेत्यांनी संगनमताने पालिकेची लूट चालवली आहे. आतापर्यंत अब्जावधी रूपयांचे घोटाळे झाले असतील. या महाघोटाळ्यांमध्ये अनेकांनी आपापले हात धुवून घेतले आहेत. अंदाजित खर्च म्हणून एखाद्या कामासाठी जितका खर्च दाखवला जातो, प्रत्यक्षात कितीतरी जास्त खर्च केला जातो. कोणतीही भरीव विकासकामे ठळकपणे दिसून येत नाही. याउलट शहराचे वाटोळे झाल्याची कित्येक उदाहरणे सांगता येतील.

जीवघेणे खड्डे.. चोहीकडे..!
शहरभरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. सिमेंटचे रस्तेही त्याला अपवाद नाहीत. पावसामुळे निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. तरीही ‘खड्डेविरहित शहर’ असल्याचे खोटे दावे पालिकेकडून केले जातात. खराब व असुरक्षित रस्त्यांमुळे वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण होत असून अपघातांचे धोके कित्येकपटीने वाढलेले आहेत. दुचाकी असो की चारचाकी वाहनस्वारांचे दररोज प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यांसाठी खर्च करण्यात आलेले करोडो रूपये पाण्याखाली गेले असून कंत्राटदारांची घरे मात्र पैशांनी ओसंडून भरली आहेत.

अपुरे आणि दुषित पाणी..
चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा हवेतच विरली आहे. प्रत्यक्षात शहरवासियांना एकवेळ पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. अनेक भागात दुषित पाणीपुरवठा होतो आहे. कित्येकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.
पिंपरी-चिंचवड हे नावापुरते ‘स्वच्छ व सुंदर शहर’ असून प्रत्येक भागात आरोग्यविषयक समस्या आहेत. मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. नद्या प्रदुषित आहेत. कंपन्यांचे सांडपाणी नद्यात थेटपणे सोडले जाते. नदीसुधारच्या नावाखाली करोडो रूपये लाटण्याचेच काम वर्षानुवर्षे सुरू आहे. खासगी रूग्णालयांमध्ये लूट सुरूच असून पालिकेतील रूग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधांची दाणादाण आहे. अशाप्रकारच्या समस्यांची जंत्री खूप मोठी आहे. मात्र त्याकडे कोणाचे लक्ष नाही.
परिस्थिती हाताबाहेर..
ठेकेदार व पुरवठादार डोळ्यासमोर ठेवून निविदांच्या अटी, शर्ती ठरवल्या जातात. त्यांना पोसण्यासाठी अनावश्यक खरेदींचा सपाटा सुरू आहे. फक्त टक्केवारीचा धंदा सुरू आहे. महापालिकेच्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवी मोडण्यात आल्या आहेत. पालिकेला कर्जबाजारी करण्यात आले. श्रीमंत पालिकेला भिकेचे डोहाळे लागले आहेत.
या अनागोंदी कारभाराकडे पालकमंत्री म्हणून अजित पवारांचे लक्ष असायला हवे होते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. शेखरसिंह अजितदादांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तालावर नाचतात. शेखरसिंह यांचे अनेक निर्णय याची साक्ष देतात.
‘विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार’..
खासदार असल्यापासून (१९९१-९२) अजित पवारांचा पिंपरी-चिंचवडशी संबंध आहे. २०१७ पर्यंत महापालिकेच्या कारभारावर अजितदादांचे एकहाती वर्चस्व होते. ‘अजितदादा म्हणतील तीच पूर्व दिशा’, असा कारभार कित्येक वर्षे होत होता. अजितदादांमुळेच शहरात भरीव विकासकामे झाली. शहराचा कायापालट झाला. विकासाचे आदर्श मॉडेल मानल्या गेलेल्या पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार म्हणून त्यांचा राज्यभरात गौरव झाला. मात्र अजितदादांच्या याच सत्ताकाळात ‘विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार’ हे सूत्र राबवत त्यांच्या बगलबच्च्यांनी प्रचंड ऊतमात केला. ठरावीक मंडळीच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारामुळे राष्ट्रवादीचा डोलारा कोसळला.
फेब्रुवारी २०१७ च्या पिंपरी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पराभव झाला. अनेक वर्षे ताब्यात असलेली श्रीमंत महापालिका हातातून गेली. त्यानंतर मे २०१९ मध्ये मावळ लोकसभेच्या निवडणुकीत पार्थ पवारांचा दारूण पराभव झाला. ज्या शहरावर आपण अतोनात प्रेम केले. जडणघडण केली, कायापालट केला, त्याच शहराने आपल्याला एकदा नव्हे दोनदा नाकारले, याचा जबर धक्का अजितदादांना बसला. तेव्हा प्रचंड नाराज झालेले अजित पवार कित्येक दिवस शहराकडे फिरकत देखील नव्हते. पुढे त्यातून ते सावरले. मात्र, या धक्कादायक पराभवांची सल त्यांच्या मनात कायम राहिली.
पुढे, २०१७ ते २०२२ अशी पाच वर्षे पिंपरी पालिकेची सुत्रे भाजपकडे होती. राष्ट्रवादीतील अनेकांनी तेव्हा भाजपचा रस्ता निवडला. भ्रष्ट कारभाराच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या पुढे दोन पाऊले जाऊन भाजपने अतिभ्रष्ट कारभार केला. शहराची वाटणी झाली. अधिकाऱ्यांमध्ये उभे गट पडले. शहरविकासाचा समतोल बिघडला. एकमुखी नेतृत्व राहिले नाही. ‘राष्ट्रवादी बरी’ असे म्हणण्याची वेळ भाजपने आणली. १४ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली, तेव्हापासून भ्रष्टाचाराचा अक्षरश: ‘नंगानाच’ सुरू आहे.

पक्षविरोधी नेते आणि टोकाची गटबाजी..
श्रीमंत महापालिकेची हातातून गेलेली सत्ता परत मिळवण्याबरोबरच पक्ष आणि पुत्राच्या मानहानीकारक पराभवाचा वचपा काढण्याचे मनसुबे ठेवून अजितदादांनी शड्डू ठोकले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्थानिक पातळीवर सक्षम असा चेहराच नाही. एक-दोघं निवडून आणता येतील, इतक्याच मर्यादित क्षमतेचे नेते आहेत. काहींच्या बाबतीत स्वत: तरी निवडून येतील का, याची शाश्वती नाही. काहींनी सुरक्षिततेचा मार्ग म्हणून भाजपचे दरवाजे ठोठावले आहेत.
पाडापाडीचे राजकारण आणि पराकोटीची गटबाजी हे राष्ट्रवादीचे जुने दुखणे आहेत. त्याचा अनुभव अजितदादांनी विधानसभा निवडणुकीत नव्याने घेतला. अजितदादांनी वारंवार बजावूनही आणि वेळप्रसंगी दमात घेऊनही पक्षातील नेत्यांनी, नगरसेवकांनी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडे यांच्या पराभवासाठी दिवसरात्र काम केले. मात्र स्वत:ची वैयक्तिक यंत्रणा आणि भाजपच्या नियोजनबध्द प्रचारमोहिमेमुळे बनसोडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
त्याचपध्दतीने, अजित पवारांचे पुत्र असूनही राष्ट्रवादीच्या अनेकांनी पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार केला होता. अजितदादांनी ज्यांना मोठे केले, पदे दिली, रग्गड पैसा कमवून दिला. त्यांनीच ‘दिवसा एक, रात्री दुसराच’ या पध्दतीने प्रचार करून पार्थच्या पराभवाला हातभार लावला होता. अजित पवारांना याबाबतची इत्यंभूत आहेच. तेच पक्षविरोधी नेते आजही अजित पवारांचे निष्ठावंत म्हणून मिरवताना दिसतात.
स्टंटबाजी नको, ठोस कृती हवी..
अशा परिस्थितीत कोणावर विसंबून न राहता आणि कोणावर विश्वास न टाकता अजितदादांना स्वतच रिंगणात उतरावे लागले. जनसंवाद, परिवार मिलन हे सारे त्यासाठीच आहे. अजितदादांचा हा जनसंवाद नेमका कोणत्या दिशेने जाणार, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शहरवासियांनी मोठ्या विश्वासाने आणि अपेक्षेने अजितदादांकडे आपापल्या तक्रारी मांडल्या आहेत. त्यावर तोडगा निघेल किंवा नाही, हा नंतरचा भाग आहे. शहरातील नागरिकांना प्रचंड समस्या भेडसावत आहेत. त्यांचे मूळचे प्रश्न सुटलेच नाहीत. नव्याने अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे एकाच जनसंवादाने काहीच साध्य होणार नाही. असे १०० जनसंवाद झाले तरी शहरातील समस्या कायम राहतील, इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या वाढून ठेवलेल्या आहेत.
यानिमित्ताने पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात शहरवासियांच्या मनात जो तीव्र असंतोष आहे, किमान त्याची दखल अजितदादांनी घेतली पाहिजे. करदात्या नागरिकांच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. संगनमताने अब्जावधींची लूट सुरू आहे, ती थांबवायची असेल तर अजितदादांनी ‘इव्हेंटबाजी’ न करता खऱ्या अर्थाने शहराचे पालकत्व स्वीकारले पाहिजे. गेल्या साडेतीन वर्षातील आर्थिक घोटाळ्यांची जी मालिका सुरू आहे, त्याची सखोल चौकशी करावी. यातील दोषींवर कारवाई करण्याची धमक अजितदादांनी दाखवावी. हा जनसंवाद फक्त निवडणूकपूर्व दिखावा किंवा राजकीय ‘इव्हेंट’ वाटू नये, यासाठी अशा माध्यमातून मांडण्यात आलेले प्रश्न मार्गी लावावेत, ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे, ती पूर्णत्वास जाणे हेच या जनसंवादाचे खरे फलित ठरणार आहे.