आळंदी (Pclive7.com):- वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगरपरिषदांना विशेष अनुदान योजने अंतर्गत आळंदी नगरपरिषद क्षेत्रात विकास कामांचा भुमीपूजन समांरभ व उद्घाटन रविवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता फ्रुटवाले धर्माशाळेत होणार आहे. यामध्ये भक्त निवास व घाट बांधकाम भूमीपूजन, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत प्रकाशन आणि रुग्ण तपासणी केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आळंदी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाकडून देण्यात आली आहे.

या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भक्तनिवास..
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांनी शासनाकडे भक्त निवास बांधकामासाठी निधी मंजूरीसाठी निवेदन दिलेले होते. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवात ९ मे २०२५ रोजी इंद्रायणी मातेचे जलपूजन करण्यात आलेले होते. त्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “भक्त निवास बांधकामासाठी” रुपये २५ कोटी निधीची घोषणा केली होती. २८ मे २०२५ रोजी नगरपरिषदांचा वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून नगर विकास विभागातून पहिला टप्पा म्हणून रुपये दहा कोटी निधी मंजूर केलेला आहे. सदर भक्त निवास इमारत महाराष्ट्र शासनाचे जागेत बांधकाम करुन संस्थान कमिटीस वापर व देखभालीसाठी हस्तांतरित होणार आहे.

दगडी फरशी घाटाचे पुननिर्माण..
१५ ऑगस्ट २०२५ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती दिनी मंदिर शिखरावर सुवर्ण कलशारोहण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी महाद्वार ते शंनि मंदिर, पाण दरवाजा ते पुंडलिक मंदिर व राम मंदिर येथील दगडी फरशी घाटाचे पुननिर्माण होणे गरजेचे आहे असे निवेदन संस्थान कमिटीने दिले होते. वरील योजने अंतर्गत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रुपये ५ कोटी निधी १६ सप्टेंबर २०२५ रोजी नगरविकास विभागामार्फत मंजूर केला.
या कामाचाही प्रारंभ यावेळी होईल..
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण प्रत प्रकाशन
महाराष्ट्री भाषेचा गौरव ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी गेली ७०० वर्षे मराठी लोकभाषेचा प्राण आहे. संस्थान कमिटी छपाई किमती पेक्षा कमी किंमतीमध्ये रुपये ८० देणगी मुल्य स्विकारुन भक्तांना श्री ज्ञानेश्वरी प्रत वितरीत करीत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून मराठी भाषा विभाग मंत्री उदयजी सामंत यांनी रुपये एक कोटी अनुदान श्री ज्ञानेश्वरी छपाईसाठी शासनाकडून उपलब्ध करुन दिले. त्यामुळे देणगी मूल्य कमी करुन रुपये ५० स्विकारुन आजपासून श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत वितरीत करण्याात येणार आहे.
रुग्ण तपासणी केंद्र..
बरेच दिवसांपासून भाविक व नागरिक यांच्या मागणीनुसार वारकरी, नागरिक, रुग्ण तपासणी केंद्र सुरु होत आहे. संस्थान कमिटी व के. के. हॉस्पीटलचे संचालक डॉ. श्रीकांत कुऱ्हाडे हे केंद्र संचलित करणार आहे. रोज सकाळी ९ ते २ या वेळेत बाहय रुग्ण तपासणी केंद्र चालू राहणार आहे. हे केंद्र सद्यस्थितीत संस्थान कमिटीच्या भक्त निवास येथे चालू होत आहे. निःशुल्क सेवा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
























Join Our Whatsapp Group