पिंपरी (Pclive7.com):- वारंवार विनंती करूनही जाणीवपूर्वक पिंपरी चिंचवड शहराकडे दुर्लक्ष केले जाते. कोणत्याही कार्यकर्त्याला ताकद दिली जात नव्हती. त्यामुळेच अखेर पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रदेश काँग्रेस वर नाराजी व्यक्त करत आज मुंबईत काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.
याबाबत सचिन साठे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पिंपरी चिंचवडमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे. वारंवार राज्य नेतृत्वाकडे मदतीचा हात मागूनही त्यांनी मदत केली नाही. पदावर राहून जर कार्यकर्त्यांना व पक्षाला न्याय देऊ शकलो नाही. यापुढे पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे, पक्ष बाधित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या २४ वर्षे विद्यार्थी दशेपासून ते पक्षाच्या विविध पदांवर तन, मन व धन अर्पण करुन काम केले आहे. यामध्ये पुणे जिल्हा एनएसयुआई अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व सध्या अध्यक्ष, पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटी अशा विविध पदांवर काम करण्याची संधी पक्षाने दिली. मी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या एक वर्षापूर्वी पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सर्व सहकाऱ्यांमध्ये पुढील कार्यकाळाकरीता अध्यक्ष पदावर पुनश्च निवड केली होती. त्यांचा मी आभारी आहे. पण इथून पुढील काळामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे.






















Join Our Whatsapp Group