पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण शुभारंभ बुधवार, दि.२४ डिसेंबर रोजी करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार कैलास कुटे, प्रसाद शेट्टी, सौ. मीनलताई यादव व सौ. ऐश्वर्याताई अमित बाबर यांच्या या प्रचाराला नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

या प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ मार्गदर्शक उमेश चांदगुडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश बाबर, शैलेश मोरे, कुणाल लांडगे, उल्हास शेट्टी तसेच सामाजिक कार्यकर्ते अजय लढा, संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना संबोधित करताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, सुरक्षा, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले टाकली आहेत. पायाभूत सुविधा, संरक्षण, अर्थव्यवस्था, डिजिटल क्रांती आणि सामाजिक न्याय या सर्व क्षेत्रांत भारताने अभूतपूर्व प्रगती साधली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जलसंधारण, शिक्षण, आरोग्य व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केंद्र, राज्य व महानगरपालिका या तिन्ही स्तरांवरील समन्वयातूनच प्रभागाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे सांगत, हा समन्वय केवळ भाजपकडेच असल्याचा विश्वास व्यक्त केला. माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांनीही भाजपच्या संपूर्ण पॅनलला विजयी करण्याचे नागरिकांना आवाहन केले.
यानंतर ढोल-हलगीच्या गजरात व घोषणांच्या जल्लोषात प्रचार रॅली काढण्यात आली. ही रॅली दत्तवाडी व विठ्ठलवाडी परिसरातून मार्गक्रमण करत विठ्ठल मंदिर पालखी तळावर उत्साहात समारोपाला पोहोचली. रॅलीदरम्यान महिला भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या, तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देत ठाम पाठिंबा जाहीर केला. या भव्य प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले असून, निवडणुकीत विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये अधिक दृढ झाला आहे.






















Join Our Whatsapp Group