पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी (दि.०६) पिंपरी गावात जाहीर सभा होणार आहे.अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

ही सभा पिंपरी गावातील श्री शिवछत्रपती स्मारक चौक येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे प्रभागातील निवडणूक प्रचाराला मोठी चालना मिळणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नुकत्याच पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी २०१७ मध्ये महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपने महापालिकेला कर्जबाजारी केले असून पालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप करत “महापालिका लुटून खाल्ली” असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. तसेच काही मंडळींकडे प्रॉपर्टी कुठून आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी पिंपरी गावात होणाऱ्या जाहीर सभेत अजित पवार काय भूमिका मांडतात आणि कोणते मुद्दे उपस्थित करतात, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.





















Join Our Whatsapp Group