पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचार मोहिमेला आज भव्य पदयात्रेद्वारे जोरदार सांगता झाली. भाजपाचे प्रमुख उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पिंपळे सौदागर येथून सुरू झालेली पदयात्रा स्वराज गार्डन चौक, सेव्हन स्टार लेन, गोविंद गार्डन रोड, कुणाल आयकॉन रोड, शिवार चौक, कोकणे चौक आणि रहाटणी चौक मार्गे विमल गार्डन चौक येथे समारोपाला पोहोचली. संपूर्ण मार्गावर शत्रुघ्न काटे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.

पदयात्रेदरम्यान शत्रुघ्न काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्न, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक यांसारख्या विषयांवर चर्चा केली. पिंपरी-चिंचवड शहराने मेट्रो सिटी म्हणून केलेली वाटचाल, उद्योग व आयटी क्षेत्रातील प्रगती आणि कष्टकरी कामगारांच्या योगदानामुळे शहराला मिळालेली ओळख यावर त्यांनी भर दिला.
पिंपरी-चिंचवडचा विकासाचा प्रवास थांबू न देता अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी दूरदृष्टी असलेले आणि ठोस निर्णय घेणारे नेतृत्व आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपाने हे कृतीतून सिद्ध केले आहे,” असे मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले. आगामी काळात प्रभाग २८ चा विकास अधिक गतिमान करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

या पदयात्रेत शत्रुघ्न काटे यांच्या पॅनेलमधील काटे अनिता संदीप (सर्वसाधारण – महिला), भिसे कुंदा संजय (सर्वसाधारण – महिला) आणि काटे संदेश रामचंद्र (सर्वसाधारण) हे उमेदवारही सहभागी होते. गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ‘कमळ’ चिन्हासमोर बटन दाबून भाजपाच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन शत्रुघ्न काटे यांनी नागरिकांना केले. पदयात्रेमुळे प्रभागातील वातावरण उत्साही व जोशपूर्ण झाले असल्याचे चित्र दिसून आले.






















Join Our Whatsapp Group