पिंपरी (Pclive7.com):- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी जाहीर प्रचारावर बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराचा कालावधी आज मंगळवार, दि.१३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपला आहे.

जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट मिडीयाद्वारे कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास मनाई राहणार आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मिडीया व मेसेजिंग ॲप्सद्वारे होणाऱ्या प्रचाराचाही समावेश आहे.

तसेच जाहीर प्रचार बंदी लागू झाल्यानंतर उमेदवार व संबंधित राजकीय पक्षांनी प्रचाराशी संबंधित सर्व फलक, बॅनर, पोस्टर्स व इतर साहित्य तात्काळ काढून टाकणे आवश्यक आहे. जर प्रचार बंदीनंतरही हे साहित्य काढून टाकले गेले नाही, तर संबंधित उमेदवारांविरुद्ध मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून, प्रचार साहित्य काढण्यासाठी झालेला खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे.
जाहीर प्रचार बंदीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मिडीयाद्वारे प्रचार करू नये तसेच सर्व प्रचार साहित्य तात्काळ हटवावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख सुरेखा माने यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group