पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या चैन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठी कारवाई करत बीडमधील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २८ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम वजनाचे अंदाजे ४ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली १ लाख ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरात मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तब्बल २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा बीड येथील रेकॉर्डवरील आरोपी गणेश भारत गिरी याने केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बीडमधून ताब्यात घेतले. पुढील तपासात आरोपी गणेश गिरी याच्याविरुद्ध पिंपरी, दिघी, निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तपासादरम्यान त्याने हे गुन्हे त्याचे साथीदार रोहन राजू जाधव, पंकज गणेश दिवटे, सुमित सोपान चव्हाण आणि ओमकार रामेश्वर लाटे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
यापैकी सुमित सोपान चव्हाण यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्याला चिखली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. या कारवाईमुळे शहरातील चैन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



















Join Our Whatsapp Group