पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात सोमवारी उशिरा रात्री भीषण ‘हिट अँड रन’ची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालवणाऱ्या चालकाने बेफाम वेगात वाहन चालवत सात ते आठ चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत.

ही घटना रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास मोशीतील बोऱ्हाडेवाडी, राजमाता जिजाऊ चौक आणि हॉटेल सिल्वर ब्लू परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कंटेनर चाकण-हायवे रोडवरून मोशी भाजी मंडई चौक मार्गे टाटा मोटर्सच्या दिशेने जात होता. चालक मद्याच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.
बोऱ्हाडेवाडी परिसरात पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. सुसाट वेगाने धावणाऱ्या कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनांना एकामागून एक धडक दिली. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांनाही जोरदार धडक बसली. परिणामी अनेक वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कंटेनरसमोर येणारे प्रत्येक वाहन उडवत तो पुढे सरकत होता. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवण्यास मदत केली.

घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मोशी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.



















Join Our Whatsapp Group