पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत आकुर्डीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे चांगलेच आक्रमक झाले. प्रभागासह शहरातील विविध प्रश्नांनावरून प्रशासन धारेवर धरले. नागरिकांना तत्काळ स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. त्याचबरोबर ५५ हजार हरकती आलेला महापालिकेचा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी आक्रमकपणे केली.

नगरसेवक प्रमोद कुटे यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण भाषण केले. कुटे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यावर ५५,००० हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हा आराखडा रद्द करून नवीन आराखडा तयार करण्यात यावा. पिंपरी-चिंचवड शहरात होणारा पाणीपुरवठा अतिशय विस्कळीत व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने आजारी पडत आहे. त्यावर उपाययोजना कराव्यात. शहरातील हवेची गुणवत्ता (AQI) जवळजवळ १५० च्या वर गेलेला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे, फुफुसाचे आजार होत आहे. यावर आपण काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती द्यावी.

आकुर्डी प्रभागात मोकाट कुत्र्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की रस्त्या-रस्त्यावर २०-२५ कुत्री बसलेली असतात ती रात्री अपरात्री कामावरून येणाऱ्या नागरीकांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे, वेळोवेळी मागणी करूनही कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. चिंचवड स्टेशन ते निगडी हरित सेतू प्रकल्प केल्यामुळे त्याठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. टू व्हीलर,फोर व्हीलर पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर गाड्या उभ्या करतात. त्यावर ट्रॅफिक विभाग दंडात्मक कारवाई करत आहे. जोपर्यंत महापालिकेकडुन पार्किंगची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू नये.
निगडी चौक ते चिंचवड स्टेशन चौक मेट्रोचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठा अपघात घडण्याआधी त्याठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशा विविध प्रश्नांवर नगरसेवक कुटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.



















Join Our Whatsapp Group