पिंपरी (Pclive7.com):- हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या “ऑपरेशन मुस्कान – १४” या विशेष मोहिमेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पोलिसांनी या मोहिमेअंतर्गत हरवलेली तब्बल १२१ बालकांचा शोध घेऊन सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दि.२० जानेवारी २०२६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही मोहीम राबविण्यात आली.

महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत १८ वर्षांखालील हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वय साधून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली. ऑपरेशन मुस्कान-१४ शोध मोहिमेमध्ये एकुण ११ बालके व ६० बालिका असे एकुण ७१ बालकांना शोधुन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. तसेच दिनांक २०/०१/२०२६ ते दिनांक २०/०२/२०२६ यादरम्यान दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये २२ बालके व ५० बालिका असे एकुण ७२ बालके हरविले होते. सदर मोहिमेत त्यांचाही शोध घेवुन १६ बालके व ३४ बालिका असे एकुण ५० बालकांचा यशस्वीरित्या शोध घेतला आहे. एकंदरीत सदर मोहिमेअंतर्गत एकुण २७ बालके व ९४ बालिका अशा एकुण १२१ बालकांचा यशस्वीरित्या शोध घेवुन पालकांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावकर, अपर पोलीस आयुक्त संजय आवाड तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महिला व बाल सुरक्षा पथक, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी ठरली.
हरवलेल्या बालकांच्या शोधासाठी पोलिसांनी रेल्वे स्थानके, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे तसेच विविध संस्थांमध्ये तपास मोहीम राबवून समन्वय साधला. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य केल्यामुळे मोहिमेला गती मिळाली. “ऑपरेशन मुस्कान – १४” मोहिमेच्या यशामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


















Join Our Whatsapp Group