पिंपरी (Pclive7.com):- यमुनानगर येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव लवकर सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे. चिखले यांनी पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री. पाटील यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १३ मधील यमुनानगर येथील कै मीनाताई ठाकरे जलतरण तलाव गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिक व जलतरणपटूंमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तलावातील पाणी न बदलल्यामुळे ते पूर्णपणे हिरवेगार झाले असून परिसरात कचरा व साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी स्थापत्य विभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून तलाव सुरू करण्यात आला होता. मात्र काही दिवसांतच तो पुन्हा बंद करण्यात आला. तलाव बंद करण्यामागील कारण स्पष्ट करण्यात आले नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. यमुनानगर, निगडी, साईनाथनगर व सेक्टर २२ येथील जलतरणपटू व नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नुकतीच नियुक्त करण्यात आलेल्या (H2O) एजन्सीने काही नागरिकांकडून वार्षिक पाससाठी शुल्क स्वीकारून पास दिले होते. मात्र मुदत पूर्ण होण्यापूर्वीच तलाव बंद केल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.

या संदर्भात मनसेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त पाटील यांना निवेदन देण्यात आले. “१५ ते २० दिवसांत तलाव सुरू करण्यात येईल,” असे आश्वासन पाटील यांनी दिल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली. तलाव लवकरात लवकर सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासोबत मनोज लांडगे, दत्ता देवतरासे, मुजू आदी पदाधिकारी उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group