इराण-इस्रायल युद्धबंदीच्या हालचाली; जागतिक शांततेसाठी भारताची डिप्लोमसी यशस्वी ठरल्याचा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा दावा
पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत सकारात्मक करार होत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर सुटकेचा श्वास घेतला जात असून, या युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा (डिप्लोमसी) मोठा वाटा राहिला आहे.तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी जागतिक शांतता कराराचे स्वागत केले असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

प्रसिद्धी माध्यमा सोबत बोलतांना कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की,२८ फेब्रुवारी रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशात भीषण युद्धाचा भडका उडाला होता. यामध्ये अमेरिका थेट सहभागी झाल्याने युद्धाचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागले. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने जगभरात महागाई प्रचंड वाढली होती. या युद्धाच्या सुरुवातीलाच ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’च्या वतीने जगातील पहिली शांतता रॅली काढून युद्ध थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते.युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला होता, तसेच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही या विषयावर सखोल चर्चा केली होती. या युद्धात भारताने अत्यंत संतुलित आणि सुरक्षित भूमिका बजावली. जागतिक संकट काळात भारताने घेतलेला हा पुढाकार देशासाठी अत्यंत जमेची बाजू ठरली आहे.

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही डिप्लोमसी या संपूर्ण कार्यकाळामध्ये स्वतः वापरली, त्या मुत्सद्देगिरीचा फायदा हा या युद्धामध्ये शांतता निर्माण होण्यासाठी झाला आणि कुठेही देशाला आपल्या त्याची झळ पोहोचू दिली नाही, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच संपूर्ण देशवासीयांनी केंद्र सरकारला या युद्धामध्ये जे सहकार्य केलं त्या भारतवासीयांचे कौतुक करतो.डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या कराराला इराणनेही दुजोरा दिला असून, लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. हा शांतता करार लवकरात लवकर अमलात यावा, जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्था आणि मानवी जीवन पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांमधून आणि कामगार वर्गातून व्यक्त केली जात आहे.येणाऱ्या काळामध्ये चांगला करार होवो, पुन्हा युद्ध अशा पद्धतीनं होऊ नये यासाठी प्रार्थनाही करतो असे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले.
“गेल्या चार-पाच दिवसांत इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा अत्यंत अस्थिर वातावरणात ट्रम्प यांनी जाहीर केलेला शांतता करार आणि मसुदा हा जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये भारताची भूमिका अत्यंत कौतुकास्पद राहिली आहे.”
– कामगारनेते यशवंतभाऊ भोसले




















Join Our Whatsapp Group