पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या घटनांमागील सराईत चेन स्नॅचरला गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली. आरोपीकडून सुमारे 76 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित इंगले (रा. सोलापूर) असे आहे. पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात सातत्याने घडणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ताज्या घटनेनंतर तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा युनिट-1 कडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून आरोपी प्रत्येक गुन्ह्यानंतर बाणेरच्या दिशेने पळ काढत असल्याचे आणि बाणेर-पुणे महामार्गाचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी संबंधित परिसरात अनेक दिवस गुप्त पाळत ठेवून सापळा रचला. सकाळच्या सुमारास संशयित आरोपी दिसताच त्याचा पाठलाग करण्यात आला. आरोपी एका बंद रस्त्यावर (डेड एंड) पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालत त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी वेषांतर करून आरोपीला पकडताना दिसत आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी हा व्हिडीओ याच ऑपरेशनचा असल्याची पुष्टी केली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथकाचा सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगितले.

२०१६ पासून गुन्हेगारीत सक्रिय..
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, सुमित इंगले हा नवीन गुन्हेगार नसून 2016 ते 2024 या कालावधीत तो सक्रिय चेन स्नॅचर म्हणून कार्यरत होता. त्याच्याविरोधात पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. जेलमधून सुटल्यानंतर त्याने सामान्य जीवन जगण्याचा आणि इतर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जुगाराच्या व्यसनामुळे तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचे तपासात समोर आले आहे.
‘क्राइम पेट्रोल’मधून शिकला गुन्ह्यांच्या युक्त्या
पोलिस चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा करत, ‘क्राइम पेट्रोल’ या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमातील काही भाग पाहून पोलिसांपासून बचाव करण्याच्या आणि चेन स्नॅचिंग अधिक प्रभावीपणे करण्याच्या पद्धती शिकल्याची कबुली दिली. त्यामुळे आरोपीने गुन्ह्यांची पद्धत बदलण्यासाठी कोणत्या युक्त्या वापरल्या होत्या, याचाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पाच गुन्ह्यांचा उलगडा..
पोलिसांच्या तपासात आरोपी एकटाच चोरीच्या घटना घडवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे करण्यासाठी तो दोन वाहनांचा वापर करत होता. त्यापैकी एक वाहन त्याचे स्वतःचे होते, तर दुसरे वाहन तो रोजच्या भाड्याने घेत होता. या अटकेमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, पुढील चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group