पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी घेतलेल्या गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्याप झालेले नाही. खडलेले बक्षीस वितरण दोन दिवसांत न केल्यास पालिका भवनात मंडळांतर्फे ढोल वादन आंदोलनाचा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.
दत्ता साने यांनी म्हटले आहे की, शहरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, सामाजिक एकोपा जपला जावा. पर्यावरण, स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. या हेतूने सामाजिक व विधायक प्रबोधन व्हावे, या हेतूने पिंपरी महापालिकेतर्फे दरवर्षी गणेश मंडळांसाठी देखावा स्पर्धा घेतली जाते. समाज प्रबोधनामध्ये उत्कृष्ट मंडळांना बक्षीस दिले जाते.
मात्र, गणेशोत्सव सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी, अद्याप बक्षीसांचे वितरण केले गेले नाही. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मांगल्याचे प्रतिक समजल्या जाणार्या या गणरायाला देखील भूलथापातून सोडले नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
न्यायायलाचा आदेश आल्यानंतरही महापालिकेमार्फत महोत्सव, जयंती कार्यक्रमावर लाखो रूपये खर्च करून साजरे करण्यात आले आहेत. काटकसरीच्या नावाखाली हार, फुले, गुच्छ बंद केल्याची नौटंकी सत्ताधार्यांकडून सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. दुसरीकडे पंतप्रधान आवास, ‘वेस्ट टू एनर्जी’, कचरा संकलन निविदामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार व घोटाळे समोर येत आहेत. या संदर्भात खुद्द भाजपचे खासदार अमर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती, अशी टीका त्यांनी केली. गणेश मंडळाची बक्षीस येत्या दोन दिवसांमध्ये न दिल्यास महापालिका भवनात ढोल वादनाचा आंदोलनाचा इशारा साने यांनी दिला आहे.