पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांना मिळणाऱ्या मुलभुत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी समस्याचे निराकरण चोवीस तासात करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘सारथी’ हेल्पलाइन सुरु केली होती. परंतू सारथी वरील आलेल्या तक्रारींचे निराकरण वेळेत होत नसल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या त्यामुळे त्यांनी महापौरांसह महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन विभागात अचानक भेट दिली. या वेळी नगरसेवक नामदेव ढाके, महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे नीळकंठ पोमन उपस्थित होते.
यावेळी तेथील नागरिकांकडून आलेल्या तक्रारी न सोडविताच त्या बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पक्षनेते एकनाथ पवार यांनी ‘सारथी’च्या तक्रारींचे क्रॉस चेकिंग करुन नागरिकांकडून फिडबॅक घेतला. तसेच त्यांची विचारपुस केली. यापुढे नागरिकांच्या तक्रारी वेळेत निरसन करण्याची तंबी संबंधित अधिकाऱ्याला दिली. दरम्यान, दक्षता व नियंत्रण विभागाकडून अधिका-यांनी बंद केलेल्या तक्रारींची उलटतपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
पिंपरी पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ म्हणून नावारूपाला आलेल्या ‘सारथी’ला अवकळा आली आहे. त्यांच्या बदलीनंतर मात्र राजीव जाधव, दिनेश वाघमारे या आयुक्तांनी सारथीकडे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा न होणे, कर्मचा-यांचे दुर्लक्षामुळे नागरिकांची ‘सारथी’ त्यांच्यासाठी उपयोगी ठरणारी निरुपयोगी ठरू लागली. सारथीवर आलेल्या तक्रारी न सोडविताच त्या बंद करण्याचे प्रमाण अधिका-यांकडून वाढले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडतेय. सारथीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यावरून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सारथीवरील तक्रारी बाबत फिडबॅक घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, सारथीवर तक्रार करणा-या काही तक्रारदारांना फोन करून त्यांच्या तक्रारीची उलटतपासणी केली आहे. प्रत्येक तक्रारदाराने नोंदविलेल्या मतासह दर आठवड्याला पक्षनेत्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे.
पक्षनेते पवार यांनी ‘सारथी’चे ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात एखादा अधिकारी सारथीवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करत असेल तर त्या अधिका-यांवर कडक कारवाई होणार आहे. तसेच अशा कामचोर अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई झाल्यास सारथीचे ख-या अर्थाने पुनरुज्जीवन शक्य आहे.






















Join Our Whatsapp Group