पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. या घटनेमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर विनायक भानवसे (रा. वरवंड ता दौंड) व आकाश राजेंद्र होले (रा. पाटस) या आरोपींचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट रचण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अधिक तपास केल्यानंतर खुनाचा कट उघडकीस आला. अवजड वाहनाच्या धडकेत आमदार कुल यांच्या गाडीला अपघात करण्याचा किंवा विहिरीच्या ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांनी उडविण्याचा कट होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून योग्य तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार राहुल कूल यांनी सांगितले की, या घटनेचा अधिक तपास पोलिस करत असून त्यांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.