पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील जनता स्टील सेंटरवर छावा संघटनेच्या मदतीने महसूल विभागाने छापा टाकला. यावेळी अनाधिकृत घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री याठिकाणी होत असल्याचे उघड झाले. या कारवाईत ४० ते ५० गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.
काळेवाडीतील जनता स्टील सेंटर या भांडे विक्री करणाऱ्या दुकानात विविध कंपन्यांचे घरगुती सिलेंडरचा काळाबाजार राजरोसपणे सुरू होता. याची माहिती छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार छावाने महसूल विभाग तसेच पोलीसांच्या मदतीने या दुकानावर छापा टाकला. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून ४ किलोचे सिलेंडर भरून ते ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय सुरू होता. यात विविध कंपनीचे भरलेले सिलेंडर येथे आढळून आले. यात हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचे दोन सिलेंडर भारत पेट्रोलियमचे चार सिलेंडर खाजगी कंपनीचा एक सिलेंडर तसेच भारत पेट्रोलियमचे चार किलो चे नऊ सिलेंडर यावेळी आढळून आले. हा सर्व मुद्देमाल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर छावा संघटनेचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमोल वीर, छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार मच्छिंद्र चिंचोले, राम सुर्यवंशी, अन्न पुरवठा अधिकारी दिनेश तावरे, श्रीमती एस.एम आंबोळे, श्री.जी.सोमवंशी, डी.व्ही.गणविरे, भावना वानखेडे, सुजाता जायभाये, श्रीराम गायकवाड, गणपत राजे आदी उपस्थित होते.