पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘वन मॅन शो’ अशी ओळख असलेल्या लक्ष्मण जगताप यांची डोकेदुखी आता वाढत चालली आहे. उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आपण चिंचवडमधून तीव्र इच्छुक असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे उपस्थित होते.
उपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढविण्यास आपण तीव्र इच्छुक आहोत. निवडणुक लढलो तर जिंकून येऊ असा विश्वास देखील आहे. चिंचवडगावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. क्रांतिकारकांचे गाव म्हणून चिंचवड ओळखले जाते. मग चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चिंचवडे लढले तर वावगे काय? आपण भाजपातून इच्छुक आहोत, नक्कीच उमेदवारी सुध्दा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या रिंगरोडला आपला तीव्र विरोध आहे. काहीही झाले तरी रिंगरोड होऊ नये हिच आपली भूमिका आहे. पंतप्रधान आवास योजनेतून शहरातील गोरगरिबांना घरे दिली जात आहेत. कोणी बेघर राहणार नाही अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. तर त्याविरूध्द शहरात रिंगरोडच्या माध्यमातून गरज नसताना नागरिकांना बेघर कशासाठी करायचे? त्यामुळे रिंगरोडला आपला पूर्णपणे विरोध राहणार आहे.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात आता भाजपातील इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापूर्वी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी देखील चिंचवडमधून लढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांचे नाव देखील चर्चेत आहे. आता थेट उपमहापौर सचिन चिंचवडे यांनीच दंड थोपटल्यामुळे शहर भाजपात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत बोलताना भाजपाचे शहर प्रवक्ते अमोल थोरात म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. कोणी इच्छुक रहायचे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. सचिन चिंचवडे इच्छूक असतील तर त्यात चुक नाही. उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील.