तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे चुलतबंधू असलेल्या भाजप नगरसेवक संदीप शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सत्तारूढ भाजपला मोठा धक्का दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकी मिळवली. त्यांच्या पाठोपाठ चुलतबंधू संदीप शेळके यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्याकडे सोपवला. या दोन राजीनामा दिल्याने भाजपचे नगरपरिषदेतील संख्याबळ १४ वरून १२ झाले आहे. सभागृहात तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ६ नगरसेवक असून जनसेवा विकास समितीचेही ६ नगरसेवक आहेत. त्यामुळे सभागृहातील भाजपचे स्पष्ट बहुमत संपुष्टात आले आहे. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे या भाजपच्या असल्याने त्यांच्या निर्णायक मतामुळे भाजपकडे कामचलाऊ बहुमत उरले आहे. पण भाजपला यापुढे सभागृहात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक गणेश काकडे, विरोधी पक्षनेते गणेश खांडगे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी संदीप शेळके यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. त्यावेळी नगरसेवक रोहित लांघे, नगरसेविका अनिता पवार, उद्योजक सुधाकर शेळके, संतोष शेळके, सुनील पवार आदी उपस्थित होते.
मावळ विधानसभेच्या भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाल्याबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे अपेक्षित असताना, त्यांनी सूडबुद्धीने पक्षातील १८ जणांवर हकालपट्टीची कारवाई केली. त्यात संदीप शेळके यांचा समावेश होता. भाजप नेत्यांनी सूडबुद्धीचे राजकारण करून आपल्यावर कारवाई केली असल्याचा आरोप संदीप शेळके यांनी केला व त्याचा निषेधही केला.
विरोधीपक्ष नेते गणेश खांडगे म्हणाले की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत केवळ विकासाचे नाव घेऊन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. बंदीस्त गटार, हिंदमाता भुयारी पूल, नागरपरिषदेच्या तलाव सुशोभीकरणात तसेच आरोग्य विभागातील ठेकेदारांना पाच महिने बिले दिली नाही. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय टाळावा.
























Join Our Whatsapp Group