पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय व प्रसिद्ध युवा उद्योजक रामभाऊ वाकडकर यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषामाई ढोरे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड.सचिन पटवर्धन, नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरसिटणीस अमोल थोरात यांच्यासह शहर पदाधिकारी उपस्थित होते.
शहरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच जनजागृती संदर्भात भाजपची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीनंतर शहर भाजपची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये वाकडचे युवा उद्योजक रामभाऊ वाकडकर यांच्यावर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रामभाऊ वाकडकर या पदाला योग्य न्याय देतील व शहर संघटन वाढविण्यासाठी काम करतील असा विश्वास आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला.