पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरातील लोकवस्ती आणि सोसायट्यांमध्ये दररोज औषध फवारणी करण्यात यावी, अशा सूचना शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने या परिसरात औषध फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांमध्ये यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने आता देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या विषाणूचा सर्वाधिक मोठा फटका पिंपरी चिंचवड शहराला बसला असून राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पिंपरी चिंचवड शहरातच आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
याच धर्तीवर एक लोकप्रतिनिधी या कर्तव्य भावनेतून नगरसेवक राहुल कलाटे यांनीही आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. परिसरात स्वच्छता राहावी व रोगराई पसरू नये यासाठी या परिसरातील वेदांत सोसायटी, लॅटिट्युड सोसायटी, सिल्व्हर कस्ट, गोविंद हौसिंग सोसायटी, क्रिस्टल हाईट्स, साई सृष्टी फेज 1व 2, चौधरी पार्क, त्रिमूर्ती अपार्टमेंट यासह इतरही भागात दररोज औषध फवारणी करण्यात येत असून नगरसेवक राहुल कलाटे स्वतः जातीने योग्य रित्या फवारणी होत आहे का? याची पाहणी करीत आहेत.
यासंदर्भात बोलताना नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले की, कोरोना नावाचा हा विषाणू एकअर्थी संपूर्ण जगावर कोसळलेले संकट आहे. दुर्दैवाने भारतात आणि प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरावर या आजाराचे मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मात्र या आजारा विरोधात जनजागृती केल्यास आणि खबरदारी घेतल्यास या विषाणूचा सामना करणे सोपे आहे. महापालिका प्रशासन यंत्रणा काम करीत असताना आपणही लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे तसेच खबरदारी बाळगून रोगराईला दूर करावे, असे आवाहन नगरसेवक राहुल कलाटे यांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group