पिंपरी (Pclive7.com):- पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी कनेक्ट’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत व्यवसाय व शिक्षणाकरिता वास्तव्यास असलेल्या उत्तर-पूर्व भारतातील नागरिकांशी संवाद वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पोलीस आयुक्तालय व विविध पोलीस ठाण्यांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्तर-पूर्व भारतातील सुमारे ७८ नागरिकांनी सहभाग घेतला.
यानंतर आयोजित बैठकीत उत्तर-पूर्व भारतातील नागरिक व पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, विशेष शाखा तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत उत्तर-पूर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व त्यावर उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, उत्तर-पूर्व नागरिकांशी नियमित संपर्कासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावर विशेष शाखेतील पोलीस उप-आयुक्त यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बैठकीदरम्यान पोलीस आयुक्तालयातील डायल ११२, विविध हेल्पलाईन क्रमांक, तसेच मोबाईल अॅप्सबाबत माहिती देण्यात आली. यानंतर हा उपक्रम सांगवी, निगडी, चिंचवड, दापोडी, संत तुकाराम नगर, एमआयडीसी भोसरी, वाकड, रावेत आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातही राबविण्यात आला. या ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात उत्तर-पूर्व भारतातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
एकूणच ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी कनेक्ट’ हा उपक्रम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात यशस्वीपणे पार पडला असून, यामुळे उत्तर-पूर्व राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास, सुरक्षितता व समाजातील आपलेपणाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
























Join Our Whatsapp Group