पिंपरी (Pclive7.com):- मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हायरल झालेल्या फोटोचा आधार घेऊन पिंपरी चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पोस्ट केली आहे. राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेल्या या बदनामीप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निगडी पोलिसांकडे केली आहे.
यासंदर्भात अमोल थोरात यांनी निगडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. निगडी पोलिसांनी सुद्धा शनिवारी (दि. १८) सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईचे फोटो विविध माध्यमांतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. या फोटोंचा गैरफायदा घेऊन राजकीय सूडबुद्धीने माझी बदनामी करण्याचे कारस्थान रचले गेले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या एका नागरिकाचा फोटो माझ्याविषयीच्या मानहानीकारक मजकूरासह फेसबुक, व्हॉट्सअप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर व फॉरवर्ड करून व्हायरल केला जात आहे. मी भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता असून, भाजपाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीचा पदाधिकारी आहे. त्यामुळे माझे काही राजकीय विरोधक माझी बदनामी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सांगून सुहास उभे या व्यक्तीने फेसबुकवर माझ्याबाबतची ही पोस्ट शेअर केली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा त्यात फोटो आहे. तो फोटो माझा असून, मी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा त्या पोस्टमध्ये उल्लेख आहे. माझी बदनामी करण्यासाठी हा खटाटोप केला गेला आहे. त्यामुळे सुहास उभे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group