पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागातील पाणी समस्या न सुटल्यास नागरिकांसह ‘रास्तारोको’ करणार असल्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि नगरसेविका शितल काटे यांनी दिला आहे.
यासंदर्भात नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरात कमी पाणी पुरवठा ही नित्याची समस्या झालेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्मार्ट प्रभाग म्हणून या पिंपळे सौदागर प्रभागाकडे पाहिले जाते.
परंतु प्रभागातील अनेक सोसायट्यामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. यात कुणाल आयकॉन, जिंजर, ओरोवेट, ब्लुवुडस, रोझवुड, समृद्धी पार्क, रोझ व्हॅली, द्वारका लॉर्ड, रॉयल ईम्पेरीयो, मन मंदिर, द क्रिस्ट, पुर्वा रेसीडेन्सी, फ्लोरा रेसीडेन्सी आदी सोसायटीमध्ये कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागरिकांची पाणी समस्या सोडविण्यासाठी, व त्यांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहोत. मात्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी यांना वारंवार तक्रारी करून सुध्दा फरक पडत नाही. दरवेळेस फिडर प्रोब्लेम, पाईप लाईन फुटली, लाईट गेली अशी उत्तरे देउन समस्येकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर-रहाटणी मधील नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील पाण्याची समस्या कायमची लवकरात लवकर सोडवण्यात यावी अन्यथा सोसायटीमधील नागरिकांना घेवुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ‘रास्तारोको’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा नाना काटे यांनी आयुक्तांना दिला आहे.