पिंपरी (Pclive7.com):- शाळा लॉक पण शिक्षण अनलॉक या महापालिकेच्या उपक्रमातून १०० टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी तातडीची बाब म्हणून इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी थेट पद्धतीने करावी, अशी मागणी शिक्षणसमिती सदस्या नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या मनपा शाळेत सर्वसामान्य व गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. आज अंदाजे ७० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणप्रवाहात तर ३० टक्के विद्यार्थी शिक्षणप्रवाहाबाहेर आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वांनाच शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी व ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबची अत्यंत गरज लक्षात घेऊन आपण या विषयाकडे गांभीर्याने पहावे, असे म्हटले आहे.
मागील आर्थिक वर्षात 23/12/2019 व दिनांक 4/1/2020 अन्वये टॅब खरेदी संदर्भाचा विषय आपल्याकडे शिक्षण समितीमार्फत मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविला होता. तथापि 2020-21 हे शैक्षणिक वर्ष संपत आले असून, अजूनही टॅब खरेदीकडे आपण लक्ष दिलेले नाही. ऑनलाइन शिक्षणाला चालना मिळण्यासाठी इयत्तावार व विषयवार अभ्यास डाऊनलोड करून आज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात टॅब असणे अत्यंत गरजेचे आहे.
बारसे यांनी दिलेल्या निवेदनबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दाखविली असून लवकरच शिक्षण समिती सभापती, सदस्य व प्रशासन अधिकारी, शिक्षणमंडळ यांचे बरोबर एक मिटिंग घेऊन शिक्षणाबाबतचे सर्व विषयांवर योग्य निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले आहे.