पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे व्यापारी गाळे, भाजी मंडईचे गाळे आदी मिळून पालिकेच्या मालकीच्या जवळपास १३६९ मिळकतींचा बेकायदा वापर होत असल्याची बाब उघड झाली आहे. या मिळकतींचे करार संपले तरी भाडेकरूंनी त्याचा ताबाच सोडलेला नाही. या जागांचा बेकायदा वापर होत असून पालिकेचे दोन वर्षांत तीन कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.
माजी खासदार गजानन बाबर यांनी माहिती अधिकारात याबाबतची माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात याबाबतची सविस्तर माहिती बाबर यांना देण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या अनेक मिळकती भाडेदराने दिल्या आहेत. व्यापारी गाळे, लीजद्वारे, भाडेदराने दिलेले गाळे तसेच भाजी मंडईचे गाळे असे त्याचे वर्गीकरण आहे. याव्यतिरिक्त, शासकीय कार्यालयांसाठी ६९ इमारती दिल्या असून पीएमपीसाठी ६ आणि मेट्रोसाठी १० जागा देण्यात आल्या आहेत.
यापैकी १४५ व्यापारी गाळे आणि १२२४ भाजी मंडईचे गाळे मिळून १३६९ मिळकतींचा करार संपलेला आहे. त्याचे नूतनीकरण झालेले नाही. तरीही त्या जागांचा वापर सुरूच आहे. परिणामी, पालिकेचे दोन वर्षांत तीन कोटींचे उत्पन्न बुडाल्याची बाब बाबर यांनी निदर्शनास आणून दिली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
मिळकतींचा अपेक्षित वेळी नवा करार तसेच नूतनीकरण करण्याची आवश्यकता होती. तसे न झाल्याने पालिकेच्या मिळकतींचा बेकायदा वापर सुरू आहे. या गंभीर बाबीकडे कोणाचेच लक्ष नाही. पालिकेचे कोटय़वधींचे उत्पन्न बुडते आहे.
– गजानन बाबर, माजी खासदार
करारनामा संपलेल्या ७५० मिळकती असतील, त्यापेक्षा जास्त नाहीत. पालिकेचे आर्थिक नुकसान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या गाळेधारकाकडे तथा भाजी मंडईधारकाकडे थकबाकी आहे, ती वसूल करण्याचे काम सुरू आहे. नियमानुसार अपेक्षित कार्यवाही केली जाईल.
– मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी, भूमी-जिंदगी विभाग






















Join Our Whatsapp Group