पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात १ जुलै २०२१ पासून पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात ४५० ठिकाणे पे अँड पार्कसाठी निश्चित केले असून या निर्णयाला सत्ताधारी भाजपच्या नगसेविका माया संतोष बारणे यांनी तुर्तास विरोध दर्शविला आहे. या संदर्भात माया बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले असून कोरोनाकाळ संपल्यानंतर या धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
माया बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करणेबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त व त्यांचे संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांचे समवेत झालेल्या बैठकीत दिनांक १ जुलै २०२१ पासुन पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्क योजनेचे सुरवात करण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे.
कोरोना काळामध्ये आधीच व्यापा-यांची तसेच सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यात आपण भर टाकू नका. सदर पार्किंग धोरणाची अंमलबजावणी कोरोना काळ संपल्यानंतर करण्यात यावी अशी सर्व नागरीकांची व व्यापा-यांची मागणी आहे. तरी तुर्तास शहरात कोरोना काळ संपेपर्यंत पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करू नये असे माया बारणे यांनी म्हटले आहे.